पुणे : कॉंक्रिटीकरणाऐवजी मुरमाचा रस्ता

खडकवासला, –पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडून कोल्हेवाडी-किरकटवाडी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण प्रस्तावित असताना केवळ मुरूम टाकून डागडुजी करण्यात आल्याने रस्त्यावर मुरूमच टाकायचा होता तर ग्रामपंचायत बरी होती की…, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेत गावाचा समावेश झाल्यानंतर पालिकेकडून हे पहिलेच काम करण्यात आले आहे. ते ही अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खडकवासल्यातील कोल्हेवाडी-किरकटवाडीचा रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्याला शिवरस्ता असेही म्हटले जाते. येथे अनेक गृह निर्माण सोसायट्या झाल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते, त्या तुलनेत रस्ता अरुंद पडत आहे. काही ठिकाणी कॉंक्रीट तर साधारण 150 फूट कच्चा आहे. या कच्च्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने या पट्ट्याचेही कॉंक्रिटीकरण करण्यात येणार होते. परंतु, या ठिकाणी लाल मुरूम टाकून केवळ डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे येथून चालणेही अवघड झाले आहे. पावसाळ्यात येथे चिखल होणार असून नागरिकांची मोठी तारांबळ उडणार आहे. त्यातच पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन व्हॉल्वचे चेंबर, गटार लाइनचे चेंबर काही ठिकाणी झाकले गेले आहेत. काही चेंबर रस्त्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे चार ते पाच मुरूमांच्या गाड्यांसाठी चार ते पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
या कामासाठी पुरेसा निधी नसल्याने खडकवासला-किरकटवाडी गावातील रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रस्तावित काम करण्यात येणार आहे. – अविनाश कामठे, सहायक अभियंता, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय





