Underwater Road-Rail Tunnel : ईशान्य भारताच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ करम्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखाली देशातील पहिल्या रस्ते आणि रेल्वे (Underwater Road-Rail Tunnel) अशा दुहेरी वापराच्या बोगद्याला शनिवारी मंजुरी दिली. १८,६६२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ भारताचा पहिलाच नव्हे, तर जगातील अशा प्रकारचा दुसरा महाकाय बोगदा ठरणार आहे. हा प्रकल्प (Underwater Road-Rail Tunnel) गोहपूर (NH-15) आणि नुमलीगढ (NH-715) यांना जोडणाऱ्या चार पदरी ‘ग्रीनफिल्ड’ कॉरिडॉरचा भाग असेल. सध्या या दोन शहरांमधील अंतर तब्बल २४० किलोमीटर असून, हे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामार्गे सुमारे ६ तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, १५.७९ किलोमीटर लांबीच्या या नवीन बोगद्यामुळे हे अंतर आणि प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प ‘इंजिनिअरिंग-प्रोक्युअरमेंट-कन्स्ट्रक्शन’ मॉडेलवर विकसित केला जाणार असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आसामसह अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांना थेट फायदा होईल. या प्रकल्पामुळे ११ आर्थिक केंद्रे, ३ सामाजिक केंद्रे आणि ८ लॉजिस्टिक नोड्स एकमेकांशी जोडले जातील. तसेच चार प्रमुख रेल्वे स्थानके, दोन विमानतळ आणि दोन जलमार्गांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन या क्षेत्राच्या विकासाला मोठी गती मिळेल. केवळ वाहतूकच नव्हे, तर रोजगाराच्या दृष्टीनेही हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. याच्या बांधकामातून सुमारे ८० लाख मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल, असा सरकारचा अंदाज आहे.