स्कूलबसच्या फेरतपासणीकडे दूर्लक्ष; केवळ 25 टक्केच तपासणी

तपासणी न केल्यास परवाना होणार निलंबित

पिंपरी – प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत उच्च न्यायालयाने राज्यभरातील सर्वच्या सर्व स्कूल बसच्या फेरतपासणी आदेश दिलेले आहेत. स्कूलबसची फेरतपासणी न झाल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्यात येणार असले तरीही पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या स्कूलबस चालक व मालकांनी या फेरतपासणीकडे दूर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंत केवळ 25 टक्केच बसची तपासणी झाल्याने उर्वरित बसचे परवाने रद्द होणार की पुढील दहा दिवसांत या बसची तपासणी केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसची वेळोवेळी तपासणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र ही तपासणी केली जात नसल्याने तसेच निकृष्ट, खराब आणि धोकायदायक गाड्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी होत असल्याचे उजेडात आल्यानंतर उच्च न्यायालयात एक जनहित याचिक दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बसची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेत स्कूल बससंदर्भात नविन नियमावली तयार करून ती लागू केली आहे. नविन नियमावली व न्यायालयाचा आदेश या नुसार स्कूलबसची तपासणी करणे बंधनकारक झाले आहे.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सध्या स्कूलबसची फेरतपासणी करण्यात येत आहे. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याची बाब समोर आली आहे. 31 मे पर्यंत सर्व स्कूलबस चालक व मालकांनी आपल्या बसची तपासणी करणे बंधनकारक असतानाही आतापर्यंत केवळ 25 टक्केच बसची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित बस मालकांनी या तपासणीकडे पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. तपासणी करून न घेणाऱ्या वाहनांवर परवाना निलंबित करण्याचे आदेश परिवहन विभागाचे आहेत. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालया बसची तपासणी करून न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तपासणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई – पाटील

आमच्या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व बसची तपाणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बसची फेरतपासणी करण्यासंदर्भात सर्वांना सूचित करण्यात आले असून आतापर्यंत 25 टक्के बसची तपासणी करण्यात आली आहे. 31 मे पर्यंत ही तपासणी मोहिम चालू राहणार असून या कालावधी तपासणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here