पुणे जिल्हा | खेड-आळंदीत काका-पुतण्यातच लढत?

चाकण, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली असून, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघात कोणाच्या पक्षाला जागा सुटेल हे तर येणारा काळ ठरवेल.
मात्र आगामी विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी तालुक्यातील इच्छुक उमेदवार रांगेत आहेत. प्रत्येक इच्छुकांची पूर्वतयारी जोरदारपणे होत असली तरी मुख्य लढत ही काका-पुतण्याच्या उमेदवारांमध्येच रंगेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जनतेच्या दरबारात चर्चेत राहण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न खेड-आळंदी मतदारसंघात गेली काही दिवसा पासून होताना दिसत आहे.
अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नाहीत; परंतु तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणूक पूर्वी इच्छुक उमेदवारकडून देवदर्शन यात्रा, सहली,पत्रकार परिषदा, पार्ट्या व आणि मोफत आरोग्य शिबिर, गणेश फेस्टिवल नवरात्र उत्सव आदी कार्यक्रमांचे अर्थपूर्ण आयोजन व आवर्जून उपस्थिती दर्शवित आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत खेड आळंदी मतदार संघात परिवर्तनासाठी अनेक इच्छुक उमेदवार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रामदास ठाकूर, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, शिवसेना शिंदे गटाचे अक्षय जाधव, शिवसेना ( ठाकरे गट) अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, विजया शिंदे,
संजय घनवट, बाबाजी काळे, अमोल पवार, आपचे मयूर दौंडकर आणि सध्या अजित पवार गटात असलेले बाबा राक्षे हे इच्छुकांच्या रांगेत आहेत.
उपमख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रे निमित्त ही जागा राष्ट्रवादी पक्षाला सुटली तर विद्यमान आमदार दिलीप मोहिते हेच आगामी विधानसभेसाठी उमेदवार असणार असल्याचे संकेत दिल्याने अजित पवार गटाकडून उमेदवार निवडीला सध्या तरी पूर्ण विराम मिळाला आहे.
तर दुसरीकडे शिरूर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले.त्यांना निवडून आणण्यासाठी खेड तालुक्याचा मोठा वाटा असल्याने या जागेची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मागणी करण्याची शक्यता आहे.
खेड-आळंदी मतदारसंघ महत्वाचा असल्याने साहेबांची भूमिका यावेळी निर्णायक असणार आहे. महाविकास आघाडीमधून सहकारी पक्ष असलेला शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील खेड दौर्या दरम्यान आमदार शिवसेनेचाच असेल असे सांगितले होते.
त्यामुळे आगामी विधासभेसाठी महाविकास आघाडी तर्फे ही जागा कोणाच्या वाट्याला येणार हे अजून गुलदस्त्यात असले तरी विधानसभेची लढत काका -पुतण्या यांच्या राष्ट्रवादी मध्येच होईल अशी शक्यता नागरिक व्यक्त करीत आहे.
कोण-कोणासमोर उभे ठाकणार?
खेड-आळंदी विधानसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो.मात्र शिवसेनेची सुद्धा या मतदारसंघात चांगली पकड आहे.
त्यामुळे हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणार का? मात्र पक्षफुटी नंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने एक गट महायुतीमध्ये तर दुसरा महा आघाडीत असे विभागले गेले आहे.
दोन्ही गट एकमेकावर टीका टिपण्णी करण्याची संधी सोडत नसल्याने आगामी खेड-आळंदी मतदारसंघात कोण कोणा समोर उभे ठाकणार हे महत्वाचे असणार आहे.
लाल दिव्याचे आश्वासन
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्या पाठीशी राहिलेले आमदार दिलीप मोहिते यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे खेचून आणली आहे. त्या कामाचे उद्घाटन व भूमिपूजन नुकतेच अजितदादा यांच्या हस्ते करून घेतले.
या दौर्या निमित्त अजितदादा यांनी आमदार दिलीप मोहिते यांचे तोंड भरून कौतुक केले व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कायम ठेऊन लाल दिव्याचे आश्वासन दिल्याने येणार्या निवडणुकीत पक्षातच बंडखोरी होईल का ? अशी चर्चा होत आहे.
मात्र परिवर्तनासाठी विद्यमान आमदारांचा सामना विरोधक कसा करणार ? त्यासाठी विरोधक एकत्र येतील का? की ऐन वेळेस विरोधका मधूनच नवीन चेहरा लढण्यास समोर येईल असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.




