हृदयद्रावक! भंडाऱ्यात काका-पुतण्याचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

भंडारा – शेतातील कालव्यात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील कारली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साहील कोकोडे, वय 12 असे मृत पुतण्याचे नाव असून हौसीलाल कोकोडे, वय 24 काकाचे नाव आहे. साहील व हौसीलाल जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. घराकडे परत येत असताना वाढत्या तापमानामुळे घामाने भिजलेले हातपाय धुण्यासाठी दोघेही कारली लघु कालव्यात उतरले असता ही घटना घडली.
हातपाय धुण्यासाठी गेलेल्या या काका-पुतण्याचा कालव्यात तोल गेला व दोघेही पाण्यात पडले. जीव वाचवण्यासाठी दोघांनी आरडाओरडा केला पण तेथे वाचवण्यासाठी कुणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी कालव्याकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.





