‘इस्रायल-हमास युद्धबंदीबाबत अजूनही अनिश्चितता’

कैरो, (इजिप्त) – इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धबंदी घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या इजिप्तला या युद्धबंदीबाबत अजूनही अनिश्चितता वाटते आहे. आज या संदर्भातल्या वाटाघाटींना पुन्हा सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वीच काही नवीन अडथळे समोर आले आहेत. वाटाघाटींचा पाठपुरावा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन मध्यपूर्वेत आले असताना काही नवीन बाबी उघड झाल्या आहेत.
करारामुळे गाझामधून इस्रायली सैन्याला खरोखरच काढून टाकले जाईल आणि युद्ध संपेल की नाही, अशी हमासला शंका वाटते आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे हमास या युद्धबंदीच्या तडजोडींच्या प्रस्तावास सहमत होणार नाही, असे इजिप्तच्या मध्यस्थ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इस्रायलने सैन्य मागे घेण्याबाबत अमेरिका अभिवचन देत आहे, हमी देत नाही, असे हमासचे म्हणणे आहे. या नवीन घडामोडींच्या अनुषंगाने अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.



