Israel – Hamas ceasefire: दुसऱ्या टप्प्याच्या चर्चेमध्ये अद्याप प्रगती नाही…

कैरो – इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत सुरू असलेल्या वाटाघाटीमध्ये अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. ही चर्चा शनिवारी पुन्हा सुरू होईल का नाही, याबाबत हमासने शंका उपस्थित केली आहे. युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये इस्रायलच्या ३३ ओलिसांची हमासने सुटका केली. तर युद्धादरम्यान मरण पावलेल्या ८ ओलिसांचे मृतदेह देखील परत देण्यात आले आहेत. त्याच्या बदल्यात इस्रायलने आपल्या तुरुंगातील २ हजार पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता केली आहे.
पहिला टप्पा शनिवारी समाप्त झाला. मात्र अजूनही दुसऱ्या टप्प्यातील वाटाघाटी पूर्ण झालेल्या नाहीत. दुसऱ्या टप्प्यासाठीची चर्चा अजून सुरू असल्यामुळे अजून पुन्हा युद्धाला सुरुवात झालेली नाही. दुसऱ्या टप्प्यात गाजामधील युद्ध पूर्ण थांबवणे आणि उर्वरित सर्व ओलिसांची सुटका केली जाणे अपेक्षित आहे.
कैरोमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटाघाटींमध्ये इस्रायल, कतार, इजिप्त आणि अमेरिकेचे अधिकारी सहभागी आहेत. या चर्चेमध्ये हमासने थेट सहभाग घेतला नाही. मात्र इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांनी हमासचे प्रतिनिधीत्व केले. मात्र शुक्रवारी इस्रायलचे प्रतिनिधी मायदेशी निघून गेल्यामुळे या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. हे प्रतिनिधी पुन्हा कैरोला जाणार की नाही, हे अनिश्चित असल्यामुळे ही चर्चा पुन्हा होणार की नाही, हे देखील स्पष्ट नसल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले.



