Shikrapur News : विनापरवाना मिरवणूक काढणं भोवलं; अध्यक्षासह डीजे मालकावर गुन्हा दाखल, शिक्रापूर पोलिसांची कारवाई

शिक्रापूर : शिक्रापूर पोलिसांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेले असताना सणसवाडीमध्ये विनापरवाना डीजे वाजवत गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याने गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर दिलीप हरगुडे व डीजे मालक महेश अनिल गुंडाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सणसवाडी ता. शिरुर परिसरात गणेशोत्सव निमित्ताने पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे,वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस शिपाई राहुल वाघमोडे हे गस्त घालत असताना सराटे वस्ती येथे मोठ्याने गाणे वाजवून मिरवणूक सुरु असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
गुरुदत्त गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विनापरवाना डीजे वाजवून विसर्जन मिरवणूक सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी सदर मंडळाला डीजेच्या तालावरील मिरवणूक बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी मिरवणूक तशीच सुरु ठेवली. त्यानंतर पोलिसांनी अध्यक्षासह डीजे मालकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी सदर डीजेचा टेम्पो त्यामधील डीजेचे सर्व साहित्य व सिस्टीम जपत केली असून याबाबत पोलीस हवालदार संदीप अरुण कारंडे वय ३८ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुरुदत्त गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर दिलीप हरगुडे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे व डीजे मालक महेश अनिल गुंडाळ वय २५ वर्षे रा. भोसे ता. खेड जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार राकेश मळेकर हे करत आहे.





