पुणे | लोहियानगरमधील अनधिकृत कट्टे व ओटे पोलिसांनी हटविले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहियानगर परिसरातील अवैध बांधकामे आणि अनधिकृतपणे बांधलेले कट्टे व ओटे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पाडले. मागील एक दिड महिण्यापासून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
काही समाजकंटक जातिय व धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एक प्रकारे समाजकंटकांना इशाराच दिला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अवैद्य बांधकामे व चौका चौकामध्ये ठेवण्यात आलेले बाकडे व अनधिकृतपणे बांधलेले कट्टे व ओटे यावर अनेक समाजकंटक सायंकाळच्या वेळी थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना तसेच काही वेळा तर महिलांना त्रास होईल, अशा पद्धतीने उभे राहत होते. तसेच मागील काही दिवसांत समाजकंटकांमुळे जातीय व धार्मिक तणाव होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे या सर्व प्रकारावर प्रभावी प्रतिबंध आणण्यासाठी समाजकंटकांना तेथे उभे राहणे व त्यांचे बसण्याचे ठिकाण हटवणे गरजेचे होते. त्यामुळे खडक पोलीस स्टेशन येथे नव्याने हजर झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे व पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी या अनुषंगाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लोहियानगर परिसरात गल्ली नं १ ते ४ व लोहियानगर पोलीस चौकी ते लोहियानगर कमान याभागात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, वैशाली तोटेवार, उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे व खडक पोलीस स्टेशन कडील १५ अंमलदार हजर होते. महापालिकेकडून क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू, अतिक्रमण निरीक्षक, राजेंद्र लोंढे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राठोड व खैरनार व बिगारी सेवक, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे कर्मचारी उपस्थित होते.





