Unauthorized hoarding: अनधिकृत होर्डिंगला दोन लाख दंड
Unauthorized hoarding:

फ्लेक्स, बॅनर, बोर्ड्सना दिवसाला दोन हजार रुपये
Unauthorized hoarding: अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर, बोर्ड्स यांच्या दंडाची रक्कम महापालिकेने वाढवली असून, ते दोन हजार रुपये ते दोन लाख रुपयांपर्यंत केले आहेत. वाढविलेल्या शुल्काचा नवा आदेश अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाने जारी केला आहे.
नव्या दरानुसार अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स आदींवरील दंडाची रक्कम ही प्रती बोर्ड, प्रती दिन दोन हजार रुपये होणार आहे. अनधिकृत होर्डिंग्जचे निष्कासन शुल्क दोन लाख रुपये प्रती होर्डिंग करण्यात आले आहे.
तात्पुरत्या कालावधीत लावण्यात येणाऱ्या बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्स, कमान यावरील जाहिरात, ड्रोनच्या सहाय्याने लावलेल्या जाहिराती, बलून, मानवी पाठीवरील, लाकडी लोखंडी कडआउट, तसेच अन्य तात्पुरत्या जाहिरातींचा दंड ४० रुपये प्रती चौ. फूट. प्रती दिन ठरवण्यात आला आहे.
फिरत्या वाहनावरील जाहिरातीसाठी विनापरवानगी वापर दंड दोन चाकीसाठी पाच हजार रुपये, तीन चाकीसाठी १० हजार, तर त्यापुढे २५ हजार रुपये आकारण्यात येणार आहे.
सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून अनाधिकृत बोर्ड, बॅनर आदींमुळे होणाऱ्या विद्रुपीकरणासाठी संबंधितांकडून प्रशासकीय शुल्क वसुल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार प्रभावीपणे वसुली केल्यास शहर विद्रुपीकरणास आळा बसेल. सदरचा खर्च संबंधित जाहिरात फलकधारकाने न भरल्यास रक्कम जागा मालकाकडून वसूल करणे आवश्यक आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.





