Pune: पालखीमार्ग होर्डिंग मुक्त करा; हवेली-पुरंदरमधील नागरिकांची मागणी

फुरसुंगी – हडपसर क्षेत्रिय कार्यालयाकडून अनधिकृत होर्डिंग काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश होर्डिंग हे पालखी महामार्ग प्रमुख महामार्गावर धोकादायक अवस्थेत आहेत. त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. पालखी सोहळा प्रस्थान ठेवण्याची वेळ आलेली असताना धोकादायक होर्डिंग कधी हटविणार? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
हवेली आणि पुरंदर तालुक्यातून पालखी मार्ग जातो. हडपसर ते जेजुरीपर्यंत या मार्गावर अनेक ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग आहेत. सदर होर्डिंगची दुरवस्था झालेली आहे. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या मार्गाने लवकरच मार्गस्थ होणार आहे, अशा वेळी हे धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंग स्थानिक प्रशासनाने तातडीने काढणे गरजेचे आहे. या मार्गात सर्वाधिक होर्डिग खळद ग्रामपंचायत हद्दीत जवळपास २० ते २२ होर्डिंग असून ते बेकायदेशीर आहेत.
काही होर्डिंगधारकांनी ते काढण्याऐवजी जाहिरातीसाठी संपर्क, असे फलक लावले आहेत. याबाबत संबंधित होर्डिंग मालकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आठ दिवसांत होर्डिंग हटविले नाही तर धोकादायक होर्डिंग प्रशासनाकडून उतरविले जाइल. सध्या तरी हे धोकादायक होर्डिंग अद्यापही जसेच्या तसे आहे.
“पालखी मार्गावरील बेकायदा होर्डिंगबाबत प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी देण्यासाठी तसेच सूचनांकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्याशी संपर्क करणार आहोत” – डॉ. अमिता पवार, गटविकास अधिकारी





