संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर गोळीबार; पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील घटना

डेरा इस्लमाईल खान, (पाकिस्तान) – संयुक्त राष्ट्राच्या विकास एजन्सीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या कारवर आज बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. ही कार बुलेटप्रुफ होती, त्यामुळे कारमधील कोणाही पदाधिकाऱ्यांना इजा झाली नाही. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात आज ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्राच्या डेव्हलपमेंट एजन्सीचे पदाधिकारी प्रोजेक्ट सर्व्हिसेसच्या कामासाठी डेरा इस्लाईल खान जिल्ह्यात आले असताना हा हल्ला झाला, असे जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले.
कारमधील सर्व पदाधिकारी सुखरुप आहेत. हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध पोलीस करत आहेत. या हल्ल्याची जबाबदारी त्वरित कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचे पाकिस्तान तालिबानने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तान तालिबाननेच केलेले असल्यामुळे या संघटनेवरच संशय व्यक्त केला जातो आहे.
तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान नावाने ही संघटना पाकिस्तानमध्ये ओळखली जाते. मात्र अफगाणिस्तानातील तालिबानशीच ही संबंधित आहे.





