अल्टिमेट टेबल टेनिस लीग : रिथच्या खेळाच्या जोरावर गोवा चॅलेंजर्स अंतिम फेरीत

पुणे – फॉर्मात असलेल्या टी रिथ रिश्याने 2-1 अशा फरकाने राष्ट्रीय विजेत्या श्रीजा अकुलावर निर्णायक सामन्यात विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर गोवा चॅलेंजर्स संघाने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ही लीग सुरू आहे. गोवा फ्रॅंचायझीने उपांत्य फेरीच्या लढतीत 8-7 अशा फरकाने दबंग दिल्ली टीटीसीचा पराभव करून सीझन 4 ची फायनल गाठली.
रिथच्या चपळ आणि आक्रमक खेळासमोर श्रीजाला हार मानावी लागली. पहिल्या गेममध्ये रिथने वेगवान फटके मारून 11-4 असा विजय नोंदवला. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या श्रीजाने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करताना 11-6 अशा विजयासह सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पण, निर्णायक गेममध्ये चेन्नईच्या रिथने 11-8 असा रोमहर्षक विजय मिळवला. भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रॅंचायझी-आधारित अल्टिमेट टेबल टेनिस लीगला प्रोत्साहन दिले आहे.
त्याआधी साथियन ज्ञानसेकरन याने 2-1 अशा फरकाने हरमीत देसाईचा पराभव करून दबंग दिल्ली टीटीसीला चांगली सुरुवात करून दिली होती. आशियाई स्पर्धेतील विजेत्या खेळाडूने चांगले फटके मारताना टेबलवर वर्चस्व मिळवले होते. हरमीतला प्रतिस्पर्धीच्या आक्रमकतेसमोर टिकता आले नाही आणि साथियनने 11-3 असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. प्रत्येक गुणासाठी चांगली रंगत झाली, परंतु साथियनने फोरहॅंडचे चांगले फटके मारून 11-9 असा हा गेम घेतला. तिसऱ्या गेममध्ये हरमीतने 11-8 असा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात सुथासिने सवेत्तबटने 2-1 अशा फरकाने आहिका मुखर्जीला मात दिली आणि गोवा चॅलेंजर्सला सामन्यात पुनरागमन करून दिले. थायलंडच्या या खेळाडूने पहिल्या सामन्यात वर्चस्वपूर्ण खेळ करून 11-5 अशी बाजी मारली, परंतु अहिकाने चांगले पुनरागमन केले आणि दुसरा गेम 11-8 असा जिंकला. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये सुथासिनीने एकहाती वर्चस्व गाजवताना 11-3 अशी बाजी मारली.
साथियन आणि बार्बोरा बालाझोव्हा या जोडीने मिश्र दुहेरीत हरमीत व सुथासिनी यांचा 2-1 असा पराभव करून दिल्ली फ्रॅंचायझीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. गोवा चॅलेंजर्सच्या जोडीने पहिला गेम 11-8 असा जिंकून आघाडी घेतली होती, परंतु साथियन व बार्बोरा यांनी पुढील दोन्ही गेम गोल्डन गुणांनी जिंकले. जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अलव्हारो रॉब्लेसने चौथ्या सामन्यात 2-1 (6-11, 11-10, 11-7) अशा फरकाने जॉन पेर्सनचा पराभव करून सामना निर्णायक वळणावर आणला.
निकाल
दबंग दिल्ली टीटीसी 7-8 गोवा चॅलेंजर्स
साथियन ज्ञानसेकरन 2-1 हरमीत देसाई (11-3, 11-9, 8-11)
अहिका मुखर्जी 1-2 सुथासिनी सवेत्तबट (5-11, 11-8, 3-11)
साथियन / बार्बोरा 2-1 हरमीत/सुथासिनी (8-11, 11-10, 11-10)
जॉन पेर्सन 1-2 अलव्हारो रॉब्लेस (11-6, 10-11, 7-11)
श्रीजा अकुला 1-2 रिथ तेनिसन (4-11, 11-6, 8-11)





