Ultimate Kho Kho 2022 : राजस्थानचा केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभव; गुजरात गुण तालिकेत…

पुणे – पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात वझीर अभिनंदन पाटीलच्या 13 गुणांच्या बहुमोल योगदानाच्या जोरावर गुजरात जायंट्स संघाने राजस्थान वॉरियर्स संघावर 42-40 असा केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभव करताना गुण तालिकेत दुसऱ्या स्थानाची निश्चिती केली. पहिल्या सामन्यात सूरज लाडेचे अफलातून आक्रमक आणि विशालचा अभेद्य बचाव अशा चौफेर कामगिरीच्या जोरावर ओडिशा जगरनट्स संघाने तेलगु योद्धाजचा पराभव करताना सलग सहाव्या विजयाची नोंद केली..
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सामन्यात गुजरातचा सहावा विजय ठरला. गुजरातने प्ले ऑफ मधील आपला प्रवेश आधीच निश्चित केला असून त्याउलट राजस्थानचा मात्र हा सलग आठवा पराभव ठरला.
राजस्थानचा वझीर ऋषिकेश मुरतावडे याने (7 बळींसह 17 गुण) जबरदस्त कामगिरी बजावली. मात्र, त्याची ही खेळीसुद्धा राजस्थानच्या विजयाचे खाते उघडू शकली नाही. राजस्थानकडून बी निखिलने 8 गुण मिळवताना उल्लेखनीय झुंज दिली. तर, गुजरातकडून सुयश गरगटेने 9 गुण मिळवताना विजयात आपला वाटा उचलला.
याआधीच्या पहिल्या सामन्यात सूरज लाडे याने तेलगु योद्धाजचे चार गडी बाद करताना एकूण 10 गुणांची नोंद केली. तर, विशालने 3 मिनिटे 53 सेकंद बचाव करताना ओडिशाला 6 बोनस गुण मिळवून दिले. या कामगिरीमुळे ओडिशाला पिछाडीवरून पुनरागमन करत तेलगु योद्धाजचा 48-39 असा 9 गुणांच्या फरकाने पराभव करता आला. या विजयामुळे ओडिशाला एकूण 21 गुणांसह गुण तालिकेत अव्वल स्थानी झेप घेता आली. गुजरात संघ 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.





