Fencing World Championships 2023 : रशियन प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन करण्यास नकार; युक्रेनियन खेळाडूस ठरवले अपात्र

मिलान :- इटलीच्या मिलान शहरात सुरु असलेल्या तलवारबाजीच्या स्पर्धेत एका युक्रेनियन महिला खेळाडूने रशियन प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यामुळे युक्रेनियन खेळाडूला जागतिक चॅम्पियनशिपमधून अपात्र ठरवण्यात आले आहे.
आपल्या रशियन प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन न केल्यामुळे वादग्रस्तपणे चर्चेत आलेल्या युक्रेनियन तलवारबाज ओल्गा खारलानने निर्विकारपणे आणि ठामपणे सांगितले की, आम्ही त्यांच्याशी (रशियनांशी) कधीही हस्तांदोलन करणार नाही. या खेळाच्या फेडरेशनच्या प्रमुखाने मला रशियन प्रतिस्पर्धी ऍना स्मरनोव्हा हिला रोखण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. मात्र ऍनाला हस्तांदोलन करणे म्हणजे, मला माझ्या देशवासियांचा अपमान करण्यासारखे वाटले. म्हणून मी खेळापेक्षा राष्ट्रभावनेला सर्वाधिक पसंती दिली.
तलवारबाजीत चार वेळा विश्वविजेतेपद मिळवलेली खारलान पुढे असेही म्हणाली की, आज माझा संदेश असा आहे की आम्ही युक्रेनियन क्रीडापटू क्रीडा क्षेत्रात रशियन लोकांचा सामना करण्यास तयार आहोत; परंतु आम्ही त्यांच्याशी कधीही हस्तांदोलन करणार नाही.
खारलानच्या अपात्रतेमुळे तिला 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता म्हणून मान्य झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सांघिक स्पर्धेतून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे.


