मियामी – युक्रेनबाबत अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या शांतता योजनेसंदर्भातली फ्लोरिडा येथे सुरू असलेली चर्चा विधायक स्वरुपात सुरू असल्याचे रशियाने म्हटले आहे. गेल्या महिन्याभरापासून या शांतता योजनेचा पाठपुरावा केला जात असून या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या चर्चेत ट्रम्प प्रशासनासह युक्रेन आणि युरोपातील प्रतिनिधीही सहभागी झाले होते. ही चर्चा विधायक आहे. कालपासून सुरू असलेली चर्चा आज आणि उद्या देखील होणार आहे, असे रशियाचे प्रतिनिधी किरिल दिमित्रियेव्ह यांनी काल पत्रकारांना सांगितले. दिमित्रियेव्ह यांनी शनिवारी ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी मियामी येथे चर्चा केली. तर युक्रेनच्या प्रतिनिधींनी अमेरिका, आणि युरोपातल्या भागीदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. रशियाबरोबरच्या चर्चेनंतर अमेरिकेच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून असेल, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. शांतता योजना रशिया आणि युक्रेन दोघांनी मान्य करावी, यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. पण दोन्ही बाजूंकडून अजूनही तडजोड केली जाण्याची चिन्हे नाहीत. वाटाघाटी सुरू असतानाच प्रत्यक्ष युद्धभूमीवर रशियाचे सैन्य मात्र युक्रेनच्या भूभागात जास्तीत जास्त आत घुसण्याच्या हालचाली करते आहे.