रशिया-युक्रेन युद्धाला वेगळे वळण, ‘हा’ देश युद्धविरामाला तयार, अमेरिकेने उचलले मोठे पाऊल

Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्धाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. युक्रेनने अमेरिकेद्वारे सादर करण्यात आलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. याशिवाय, रशियासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने चर्चा सुरू करण्यावरही सहमती झाली आहे.
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक तास झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या कराराअंतर्गत आता अमेरिकेने युक्रेनसोबत लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती शेअर करण्यावरील बंदी तात्काळ उठवण्याची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये पार पडलेली बैठक वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये चर्चा पार पडली असून, युद्धासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख आंद्रेई येरमाक यांनी माहिती दिली की, “युक्रेन शांततेसाठी तयार आहे. आम्ही या प्रस्तावाचे स्वागत करतो आणि तो सकारात्मक असल्याचे मानतो,” तसेच, रशियानेही अटींचे पालन करण्यास सहमती दर्शविली तरच हा युद्धविराम प्रभावी होईल, असेही ते म्हणाले.
युद्धविरामाच्या प्रस्तावावर बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, अमेरिकेला आता रशियाला हे करण्यासाठी राजी करावे लागेल. आम्हाला आशा आहे की हे निष्पक्ष आणि दीर्घकाळ शांततेच्या दिशेने पहिले पाऊल असेल.
याबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, युक्रेन युद्धविरामावर सहमत झाला आहे. आता आपल्याला रशियाला जायचे आहे आणि आशा आहे की राष्ट्राध्यक्षपुतिन देखील यावर सहमत होतील.
अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चर्चेचे नेतृत्व केले. युद्धविरामाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आता चेंडू रशियाच्या कोर्टात आहे. आम्ही हा प्रस्ताव रशियाला कळवू आणि आशा करतो की ते यासाठी तयार होतील. जर रशियाने हा प्रस्ताव स्वीकारला तर पुढील टप्पा दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सविस्तर वाटाघाटींचा असेल.’
त्यामुळे आता रशिया कायम भूमिका घेणार यावर आता या युद्धाची स्थिती अवलंबून असणार आहे. तसेच, युक्रेनमधील खनिजाबाबत लवकरच करार करण्यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.





