‘उदे ग अंबे उदे…’ नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरूवात; देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

Shardiya Navratri 2024 | देशभरात आजपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. राज्यभरातील नवदुर्गेच्या मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आठ वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना झाली. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरही भाविकांची गर्दी झाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात फुलांसह, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
तुळजाभवानी मंदिर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देवीच्या गाभाऱ्यात दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. पहाटेच मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली.
पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. त्यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. तुळजाभवानी मातेच्या दरबारातुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन ती अनवाणी पायांनी पायी चालत नेण्याची प्रथा आहे.
कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर
आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात धार्मिक मंत्रोच्चारामध्ये घट बसवण्यास सुरुवात झाली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर तसंच विविध वेळी तोफेची सलामी दिली जाते. ही शिवकालीन परंपरा आजही जपली जाते. पहाटेपासूनच अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे.
माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात
नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. पुढील नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.





