Uddhav Thackeray : जिल्हा परिषद निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले “निवडणुकीत पैशाचा महापूर असूनही…“
Uddhav Thackeray : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे
Uddhav Thackeray : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीने १२ जिल्हा परिषदांवर विजयाचा झेंडा फडकावला. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच नंबर एक ठरला आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“निवडणुकीत पैशाचा महापूर असूनही निष्ठेची भिंत तोडता आली नाही. लोक आजही आपल्याकडे आशेने पाहत आहेत. आज परिस्थिती प्रतिकूल असली तरी उद्याचा काळ हा आपलाच असेल. या निवडणुका तुम्ही धैर्याने लढला, हीच खरी ताकद आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुकीच्या निकालावर दिली. त्यांनी या विधानातून कार्यकर्त्यांना निराश न होता पुढील लढ्यासाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला.
उरण आणि रायगड येथील उबाठा गटाच्या विजयी उमेदवारांनी रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांचे अभिनंदन करत मार्गदर्शन केले. त्यावेळी वरील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. या निवडणुकीत १२ जिल्हा परिषदांपैकी भाजप ८, शिवसेना शिंदे गट ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे जिल्हा परिषदेवर बाजी मारली आहे. याउलट महाविकास आघाडीला या निवडणुकीतही मोठा धक्का बसला आहे. या निकालांवर उद्धव ठाकरे यांनी पराभव मान्य केला असून प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रपूरातील भाजपयुतीवर संजय राऊतांचे भाष्य
चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी कालही सांगितलं आहे. काँग्रेस पक्षाने अधिक गंभीरपणे शिवसेनेच्या नगरसेवकांशी चर्चा करण्याची गरज होती. त्यात वंचितचेही लोक होते. पण दुर्देवाने तिथे काँग्रेसचे दोन गट असून, त्यांच्यात शेवटपर्यंत एकवाक्यता झाली नाही. आम्ही त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोललो. खासदार धानोकर, विजय वडेट्टीवार यांच्याशीही बोलणं झालं. दोघांमध्येही एकमत होत नव्हतं. अशावेळी स्थानिक राजकारणात उलथापालथ झाली आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी भाजपसोबत उबाठाने केलेल्या युतीवर दिली.






