Uddhav Thackeray’s first reaction to the Pradeep Purnekar case : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी रात्री मनोरमा नगर परिसरात ही घटना घडली.
पूर्णेकर हे नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात बसले असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाकडून ही राजकीय हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत विभागप्रमुखांना पूर्णेकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंचे आवाहन
उद्धव ठाकरे म्हणाले, “ठाण्यात दडपशाही सुरू आहे. त्यांची दडपशाही किती दिवस चालेल? आपण त्याला उत्तर द्यायचं. गद्दारी त्यांनी केली आहे. त्यांच्या विरोधात आपण कायम उभे राहणार आहोत. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहायचं.”
पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात पप्या शिंदेसह दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
संजय राऊतांचा सवाल
या घटनेनंतर खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी एफआयआरमध्ये मुख्य संशयिताचे नाव नसल्याचा दावा करत पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला.
“कुटुंबाला ज्यांच्यावर हत्येचा संशय आहे, त्यांचं नावच एफआयआरमध्ये नाही. मुख्य संशयिताचं नाव एफआयआरमध्ये नसेल तर तुम्ही कोणाला वाचवत आहात?” असा सवाल राऊत यांनी केला.
नेमकं काय घडलं होतं?
ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर चार राऊंड फायर केले. त्यापैकी दोन गोळ्या त्यांना लागल्या. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Benjamin Netanyahu: ‘आम्हाला ९/११ सारख्या दुर्घटनेतून वाचवलं’; भारतीय पायलटच्या धाडसाचं नेतान्याहूंकडून कौतुक