उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात ! सुषमा अंधारे म्हणतात,”प्रत्येक शिवसैनिक..”

मुंबई- राज्य सरकारकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत संपूर्ण ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ठाकरे कुटूंबियांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
या आगोदर उद्धव ठाकरे यांना झेड प्लस आणि आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा होती. फक्त कुटुंबियांचीच नव्हे तर मातोश्रीच्या जवळपासच्या परिसरातील देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलिस तैनात असतात. मात्र, आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
गृह विभागाकडून अद्याप या सुरक्षेतील कपातीमागील कारण सांगण्यात आलेले नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौरे करत असताना त्यांच्या ताफ्यात काही गाड्या असतात त्यामधील एक एस्कॉर्ट वाहन देखील कमी करण्यात आले आहे.
शिवसैनिक छातीचा कोट करेल
आम्हाला याचे काही आश्चर्य वाटत नाहीये, सूडबुद्धीचे राजकारण करण्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार क्रयशक्ती खर्च करत आहेत. ही कृती सरकारकडून अपेक्षितच होती. एका सन्मानिय पक्षप्रमुखाची सुरक्षा अशी कमी करून मुख्यमंत्री आपला लौकिक कमी करुन घेत आहेत,’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. आमच्या पक्षप्रमुखांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार असेल असेही त्यांनी म्हटले आहे.




