उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळावा भाषणातील 10 मोठे मुद्दे –

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकांच्या तारखांची अद्याप घोषणा झाली नाही. पण सर्वच राजकीय पक्ष ‘इलेक्शन मोड’मध्ये गेल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा आज शिवतीर्थावर झाला. (Uddhav Thackeray Dussehra Melava full speech 2024 )
यादरम्यान, पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, नेते भास्कर जाधव, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यादरम्यान, सर्वांनी केंद्रातील एनडीए सरकारसह राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे –
मला दिल्लीश्वरांची परवा नाही, मी अजूनही उभा –
आजची लढाई सोपी नाही. एकीकडे अब्दाली सारखी माणसे आहेत. पण त्यांना कल्पना नाही की ही ठाकरेंची शिवसेना आहे. जनता ही आमची वाघनखे आहेत. माझ्याकडून सर्वकाही ओरबाडून घेतले. पण त्यानंतरही जनता माझ्या सोबत राहिली. त्यामुळे मला दिल्लीश्वरांची परवा नाही. त्यांच्या छातीत भगवा गाडून मी आजही इथे उभा आहे. आता येथील शिवसैनिक मशाल बनून सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही.
आमची भाजपला खांदा देण्याची इच्छा –
हिंदुत्त्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान, अशी मिंधेंची जाहिरात आहे. हे मिंधे एकप्रकारचे लांडगे आहेत. त्यांनी वाघाचे कातळ घातले आहे. हे महाभारत सुरू आहे. महाभारतात 100 कौरव होते. त्यांच्याविरोधात 5 पांडव उभे होते. शकुणीमामा कोण हे सर्वश्रूत आहे.
भाजप शिवसेनेला संपवण्यास निघालाय –
भाजप शिवसेनेला संपवण्यास निघाला आहे. त्यांना साथ देऊन आम्ही चूक केली. ते आमचेच पाप आहे. पण आता आम्हाला भाजपला खांदा द्यायचा आहे. आमच्यावर महाभारतासाठी परिस्थिती आली आहे. माझ्याच कुटुंबातील लोक माझ्याविरोधात उभे आहेत. पण आम्ही कृष्णाने सांगितल्याप्रमाणे आमच्या शत्रूंना ठेचून काढणार.
प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधणार –
श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण आज दसरा साजरा करतो. प्रभू श्रीरामांसोबत वानरसेना होती. ते आमचे दैवत आहेत. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजही आमचे दैवत आहेत. ते मते मिळवण्याची मशिन नाहीत. भाजपने मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला. पण त्यातही त्यांनी पैसे खाल्ले. महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधले जाईल. पंतप्रधान मोदींना शिवाजी महाराज हे मते मिळवण्याचे यंत्र वाटतात. त्यांनी त्याचा वापर ईव्हीएमसारखा करू नये. जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेन त्यांना महाराष्ट्र बघून घेईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हा भाजप आमच्यावर राज्य करू शकत नाही –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहेत. मला सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी आदर आहे. पण त्यांच्या कामाबाबत कोणताही आदर नाही. त्यांनी हिंदुंना एकजूट होण्याचे आवाहन केले. पण त्यांच्याच सरकारच्या 10 वर्षांत हिंदू संकटात सापडला आहे. संघाला आताची भाजप मान्य आहे का? आम्हाला ही भाजप मान्य नाही. तेव्हाचा भाजप पवित्र होता. पण आताचा भाजप हायब्रिड झाला आहे. हा भाजप आमच्यावर राज्य करू शकत नाही. भाजपला भारतीय म्हणताना स्वतःलाच लाज वाटली पाहिजे. हा पक्ष आता जनतेचा राहिला नाही. त्यांनी चोर व गद्दारांना डोक्यावर घेतले आहे.
भाजपकडून जाती-पातीत भांडणे लावण्याचे काम –
भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. पण त्याची पूर्तता अद्याप केली नाही. भाजप सध्या केवळ जाती-धर्मांत भांडणे लावण्याचे काम करत आहेत.
भाजपला गुलाबी अळी अन् दाढीवाला खोडकिडा लागला –
कापसाच्या खोडाला खोडकिडा लागतो. तर बोंडावर गुलाबी अळी पडते. तिला गुलाबी अळी म्हणतात. आता भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागला असून, बोंडालाही गुलाबी अळी लागली आहे. मी काही दिवसांपूर्वी नागपूरच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथे शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती माझ्या कानावर आली. त्यांना बँका कर्ज देत नाहीत. निसर्ग साथ देत नाही.
अदानींना देण्यात आलेले धारावीचे कंत्राट रद्द करणार –
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानींना देण्यात आलेले कंत्राट रद्द करणार. महायुती सरकार धारावी प्रकल्पाच्या माध्यमातून अवघी मुंबई गौतम अदानींच्या घशात घालत आहे. पण आमचे सरकार आल्यानंतर अदानींना देण्यात आलेले धारावीचे कंत्राट रद्द करेल. आम्ही तिथे पोलिसांना जागा देऊ. वांद्रेची जागा आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना दिली होती. पण शिंदेंनी ही जागा कोर्टाला दिली. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा ही जागा सरकारी कर्मचाऱ्यांना देऊ.
सरकारने 3 लाख कोटी कंत्राटदारांवर उधळले –
महायुती सरकारने 3 लाख कोटींची रक्कम कंत्राटदारांवर उधळली. राज्य सरकारची कर्ज घेण्याची काही मर्यादा असते. ते कर्ज काढून फटाके फोडत आहेत. सर्वसामान्यांपुढे दिवाळी साजरी करण्याचे चित्र उभे करत आहेत. आज निर्माण झालेली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. या सरकारने अदानींना चंद्रपूरच्या खाणी, शाळा, धारावी, मिठागरे सर्वकाही देऊन टाकले. आम्ही ही मुंबईत रक्त सांडवून मिळवली. त्यामुळे ती आम्ही अशीच कुणालाही देणार नाही.
मोदी – शहांच्या हातात महाराष्ट्र जावू देणार नाही –
महाराष्ट्र कोणत्याही स्थितीत मोदी – शहांच्या हातात जाऊ न देणार नाही. आज न्यायमंदिराचा दरवाजा ठोकून आमचे हात दुखत आहेत. पण आम्हाला न्याय मिळत नाही. आम्हाला न्यायदेवता पावत नाही. पण मी माझ्या जिवात जीव असेपर्यंत महाराष्ट्राची लूट होऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी हा महाराष्ट्र मोदी – शहांचा होऊ देणार नाही. शाहू – फुले – आंबेडकरांचा महाराष्ट्र मी मोदी – शहांच्या हातात जाऊ देणार नाही.
उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील संपूर्ण भाषण ऐका –




