Uddhav Thackeray News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चार आठवड्यांत अधिसूचना काढली जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकी महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराजयाने महाविकास आघाडी खचली होती. मात्र, आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीला उभारी घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. मात्र, या स्थितीत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे राहणार की नाही यावर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीमुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील अस्तित्वाची चर्चा रंगली आहे. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईवर शिवसेनेची (ठाकरे) गेल्या २५ वर्षांपासून सत्ता आहे. मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना २५ वर्षांपासूनची सत्ता राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे, भाजपनेही मुंबई मनपावर महापौर बसवण्यासाठी ताकद लावली आहे. गेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये केवळ दोनचा फरक होता. भाजपकडे ८२, तर शिवसेनेकडे ८४ नगरसेवक होते. त्यानंतर मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेत आल्याने सेनेची संख्या ९० झाली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेने ३ जागांवर उमेदवार निवडून आणले. त्यामुळे सेनेचे ९३ संख्याबळ मुंबई महापालिकेत होते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर आतापर्यंत ३५ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात सेनेच्या अनेक बालेकिल्ल्यांना सुरुंग लागला आहे. उद्धव ठाकरेंना या ठिकाणी बुरुज बांधण्यासोबतच नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे ठाकरेंची यासाठी चांगलीच कसोटी लागणार आहे. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या दृष्टिने मुंबई महापालिकेची निवडणूक हा त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी कसल्याही परिस्थितीत मुंबई पालिका जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंना युतीसाठी हात पुढे केला असता त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी उद्धव महाविकास आघाडीसोडून राज ठाकरेंसोबत युती करणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.