Sanjay Raut : येत्या मे महिन्यात विधानपरिषदेतील ९ जागा रिक्त होत असून, यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे. संख्याबळानुसार ही जागा पुन्हा उबाठा गटाला मिळावी असा आग्रह धरला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीच पुन्हा विधान परिषदेवर जावे अशी इच्छा असल्याचे मोठं विधान यापूर्वीच उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यातच दिल्ली येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एक सूचक विधान केले आहे. “उद्धव ठाकरेंची इच्छा ते स्वत: सांगतील. पण आम्हाला सर्वांना असं वाटतंय की उद्धव ठाकरेंनी या राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यांनी संकटकाळात उत्तम नेतृत्व केले आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे एक चांगले संकेत असतील आणि यामुळे आमच्या आमदारांना एक बळ मिळेल,” असे संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना राऊत म्हणाले, विधानपरिषदेच्या विषयाची चर्चा महाराष्ट्रात होईल. राज्यसभा जर महाविकासआघाडीतील एखाद्या पक्षाला दिली असेल, तर आमचे २० आमदार आहे. महाविकासआघाडीत सर्वाधिक २० आमदार आमच्या पक्षात आहेत. आमचे २० आमदार असतानाही आम्ही राज्यसभा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. त्यामुळे आता यावर मविआतील जे पक्ष आहेत, प्रमुख पक्ष किंवा इतर यांच्याशी सोबत बसून चर्चा करावी लागेल, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे या जागेवर उबाठा गटाचा दावा सांगितला आहे. त्यामुळे आघाडीत विधानपरिषद जागेवरुन इतर पक्षही दावा करण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपणार उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. ही जागा रिक्त होत असून, ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र याबाबत निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. या नऊ जागापैकी संख्याबळ पाहता केवळ एकच जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केले आहे. यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही एकत्रित निर्णय घेऊ तो तुम्हाला दिसेल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडे असलेल्या सुमारे ४८ ते ५० आमदारांच्या जोरावर एका उमेदवाराला निवडून आणणे सोपे असले, तरी दुसऱ्या जागेसाठी त्यांना मित्रपक्षांच्या मदतीची आणि अतिरिक्त मतांची मोठी गरज भासणार आहे. हेही वाचा : Relationship Tips: नात्यात तुम्ही टॉक्सिक आहात का? स्वतःलाच विचारा हे चार महत्त्वाचे प्रश्न