New Parliament Inauguration : उद्घाटनाला ठाकरेंना कोण नेतंय? ते विधान परिषदेत 2 तास बसत नाहीत – फडणवीस

मुंबई – उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते तिथे दोन तासांच्या वर बसत नाही. त्यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला कोण घेऊन जात आहे?, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नाही म्हणून विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले, नवीन इमारत केवळ संसद भवन नाही. तर, देशातील 140 कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. अशा मंदिराच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे होईल. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी संसदेच्या एन एक्स इमारतीचे उद्घान केले होते. तेव्हा विरोधकांना राष्ट्रपतींची आठवण झाली नाही का? इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचेही उद्घाटन केले आहे. तेव्हा विरोधकांना राज्यपालांची आठवण झाली नाही का? राजीव गांधी यांनी संसदेतील वाचनालयाचे उद्घाटन केले होते. तेव्हा विरोधकांची ही भूमिका कुठे गेली होती?, अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली.
सोनिया गांधींनीही विधानभवनाचे उद्घाटन केले
फडणवीस बोलताना पुढे म्हणाले, नितीश कुमार यांनी बिहार विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहाचे लोकार्पण केले. तामिळनाडूतील विधानभवनाचे उद्घाटन हे तर सोनिया गांधी यांनी केले आहे. त्यावेळी त्या फक्त एक खासदार होत्या. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनीही आपापल्या विधानभवनातील सभागृहांचे लोकार्पण केले आहे.
विरोधक हे खुर्चीचे व्यापारी आहेत. केवळ खुर्चीसाठी राजकारण करणारे हे लोक आहेत. सत्तेच्या लालसेसाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. कारण आपण एकएकटे नरेंद्र मोदींचा सामना करू शकत नाही, याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. मात्र, ते सर्व एकत्र आले तरी मोदींचा सामना करू शकत नाहीत. निवडणुकीत मोदींना पराभूत करण्याचे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी म्हटले.





