उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणाले,”धीर सोडू नका, आपण ‘त्यांना’ मदत करण्यासाठी भाग पाडू”

औरंगाबाद : राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. यावेळी ते औरंगाबादमधील नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. तर शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत “धीर सोडू नका” असे म्हटले.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावातील नुकसानग्रस्त भागातील उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचे सुद्धा सांगितले. तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा, अशी कैफियत शेतकऱ्यानी उद्धव ठाकरेंसमोर मांडली.यावेळी ठाकरे यांनी “सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू यात असे आश्वासन दिले.
राज्यात शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे हा दौरा ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केला असल्याने, सत्ताधारी यांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे. उद्धव ठाकरे आजारी असतांना देखील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटात यानिमित्ताने चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.





