Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाने आज (१९ जुलै) मुंबईत एका विशेष आंदोलनाची हाक दिली आहे.

Uddhav Thackeray : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सध्या एका मोठ्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधून घेतले आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक मागील २१ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन (Uddhav Thackeray) करत होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र रुग्णालयातूनही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.
दुसरीकडे, जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनीही उपोषण सुरू केले आहे. वांगचूक आणि दीपके यांच्या या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असून, महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
ठाकरे गटाचे मुंबईत आंदोलन; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाने आज (१९ जुलै) मुंबईत एका विशेष आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात मुंबईकरांनी तसेच देशप्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरेंकडून करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनावरून आता मुंबईत नवे राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.
“ठाकरेंचे आंदोलन बेकायदेशीर”; गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या आंदोलनाला प्रसिद्ध वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ठाकरेंचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सदावर्ते यांनी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरेंनी आंदोलनासाठी निवडलेल्या जागेवरच कायदेशीर आक्षेप घेतला.
सदावर्ते यांनी दावा केला की “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आंदोलनासाठी निवडलेली जागा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मुंबईत आझाद मैदानाशिवाय इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आंदोलने करण्यास कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे हे आंदोलन कायद्याचे उल्लंघन करणारे आहे.”
शिवाजी पार्क ‘सायलेन्स झोन’; पोलिसांकडे कारवाईची मागणी
या प्रकरणी अधिक माहिती देताना सदावर्ते म्हणाले की, त्यांनी स्वतः शिवाजी पार्क पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी या आंदोलनाला कोणतीही अधिकृत परवानगी दिली नसल्याचे समोर आले आहे.
“आपले वर्तन नेहमी कायदेशीरच असले पाहिजे. शिवाजी पार्क परिसर हा ‘सायलेन्स झोन’ (शांतता क्षेत्र) म्हणून घोषित आहे. केवळ स्वतःच्या राजकारणासाठी स्थानिक नागरिकांची शांतता भंग करणे बेकायदेशीर आहे,” असा घणाघाती आरोप सदावर्ते यांनी केला. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनी या बेकायदेशीर आंदोलनावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा बेकायदेशीर ठिकाणी आंदोलने केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. “ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. कोणत्याही मैदानाचा किंवा जागेचा वापर प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून कारवाई करावी,” असे सांगत त्यांनी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र दिले आहे.
या आंदोलनाप्रकरणी उद्धव ठाकरे आणि संबंधितांवर कलम २२३, २९१, २९२ आणि १९६ अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी सदावर्ते यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे आता या आंदोलनावरून मुंबई पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






