“रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…” ; उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेची खिल्ली

Uddhav Thackeray on Eknath Shinde । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा काल अंधेरीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी,”एकनाथ शिंदे यांची अवस्था रुसू बाई रुसू अशी झाली आहे “असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली.
“रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू Uddhav Thackeray on Eknath Shinde ।
शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळावा काल मोठ्या दिमाखात काल अंधेरीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना मान दिला जात होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना सांगण्यात आलं आहे बसायचं तर बसा नाहीतर गावी निघून जा. ते एक गाणं होतं ना, रुसू बाई रुसू गावात बसू का कोपऱ्यात बसू तशी यांची अवस्था झाली आहे” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची जोरदार खिल्ली उडवली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी,” पाहिजे ते मंत्रिपद दिलं नाही रुसले, गेले गावी. दावोसला नेलं नाही रुसले, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागले आहेत. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे. आपल्याला वाटलं यांचं गाढव आपण अडवलं आहे आता विधानसभा जिंकलीच पण थोडं नाही म्हटलं तरीही आपण गाफिल राहिलो. असंही उद्धव ठाकरे अंधेरी येथील भाषणात म्हणाले.
मी हिंदुत्व सोडलेलं नाही Uddhav Thackeray on Eknath Shinde ।
उद्धव ठाकरे यांनी पुढे, “आपण गाफिल राहिल्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात अपप्रचार करण्यात आला. लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या देशभक्त बांधवांनो म्हणत होतो यात काय चूक केली? हिंदू देशप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी नाहीत का? पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा प्रचार केला. अनिल देसाईंच्या सभेत मी मुस्लिमांना विचारलं होतं की मी हिंदुत्व सोडलं आहे का? त्यावर त्यांनी सांगितलं नाही. माझं हिंदुत्व त्यांनीही मान्य केलं.
मोहन भागवत मशिदीत गेले होते, मी नाही
त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी, “माझ्या फोनमध्ये १०० हून अधिक फोटो आहेत. सगळेजण टोप्या घालून बसले आहेत. मोहन भागवत मशिदीत गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. दगाबाजीचा उल्लेख अमित शाह करतात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात. प्रजासत्ताक दिन येतो आहे, आपल्या देशाचा तिरंगा आहे पण त्यातही हिरवा रंग आहे. तुम्ही तो तिरंगा तुमच्या कार्यालयावर फडकवत नव्हतात. आमचा झेंडा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, त्याला डाग लावण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. आम्ही देशप्रेमी मुस्लिमांना आमचे मानतोच. पण देशप्रेमी मुस्लिमांना तुमच्याविरोधात आम्हाला मतदान केलं म्हणून तुम्हाला पोटशूळ उठला असेल तर अमित शाह यांना जाहीर आव्हान देतो आहे की भाजपाच्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवावा त्यानंतर आम्हाला हिंदुत्व शिकवा.” असे म्हणत त्यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला.





