Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? आमदारांबाबत मोठी अपडेट समोर
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) ९ खासदारांपैकी तब्बल ६ खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत जाहीर प्रवेश केला होता.

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाला लागलेले धक्के थांबण्याचे नाव घेत नसून, राजकीय वर्तुळातून आता आणखी एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) ९ खासदारांपैकी तब्बल ६ खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत जाहीर प्रवेश केला होता.
या मोठ्या फुटीमुळे ठाकरे गटाची संसदेतील ताकद घटून केवळ ३ खासदारांवर आली, तर दुसरीकडे ७ खासदार असलेल्या शिंदे गटाची सदस्यसंख्या आता १३ वर पोहोचल्याने त्यांची ताकद लक्षणीय वाढली आहे.
खासदारांच्या या मोठ्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दुसरा मोठा धक्का बसला होता. ही राजकीय उलथापालथ ताजी असतानाच, आता शिंदे गटाकडून थेट आमदारांच्या मेगाभरतीचा दावा करण्यात आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर यांनी सोलापूर येथे आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश हा तर केवळ पहिला टप्पा होता, आगामी काळात ठाकरे गटाचे आणखी २६ आमदार शिवसेना शिंदे गटात दाखल होणार आहेत, असा थेट दावा हिवरकर यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध समाजांचे मोठे नेते आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे पक्षप्रवेश पाहायला मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आमदारांच्या रूपाने पुन्हा एकदा सर्वात मोठा धक्का बसणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, राजकुमार हिवरकर यांच्यापूर्वीही शिवसेना शिंदे गटाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अशाच प्रकारचे दावे केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यात ‘ऑपरेशन टायगर ३.०’ सुरू झाल्याचे सूचक वक्तव्य केले होते, तर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या ओबीसी जिल्हाप्रमुखांनी थेट २६ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा आकडा जाहीर केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आगामी काळात मोठी राजकीय नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






