Uddhav Thackeray : फेररचना विधेयक म्हणजे मते चोरण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
मतदारसंघ फेररचना विधेयक हे मते चोरण्याचा एक प्रयत्न आहे. आता अशा प्रकारे मतदारसंघांची फेररचना केली जाईल, ज्याचा फायदा केवळ भाजपलाच होईल, असा आरोप ठाकरेसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.

Uddhav Thackeray : मतदारसंघ फेररचना विधेयक हे मते चोरण्याचा एक प्रयत्न आहे. आता अशा प्रकारे मतदारसंघांची फेररचना केली जाईल, ज्याचा फायदा केवळ भाजपलाच होईल, असा आरोप ठाकरेसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. मी या विधेयकाला पाठिंबा दिला असता, परंतु माझ्यासाठी माझ्या पक्षापेक्षा महाराष्ट्र आणि भारताचे हित अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मतदारसंघ फेररचना आयोगाच्या सदस्यपदी मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यावर आक्षेप घेतला. विरोधी पक्षांनी विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने या विधेयकाला दिलेल्या पाठिंब्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, तुम्ही दोन बोटींवर पाय ठेवून प्रवास करू शकत नाही.
प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी(शप) चे अध्यक्ष शरद पवार यांची मनधरणी करण्याबाबत विचारले असता, ठाकरे म्हणाले की, पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे शरदचंद्र पवार यांची भेट घेतील. मतदारसंघ फेररचना विधेयक हे मते चोरण्याचा प्रयत्न आहे. तसेच, द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी विधेयकाबाबतच्या आपल्या भूमिकेवर पुनर्विचार केला पाहिजे.
स्टॅलिन तमिळनाडूशी प्रतारणा करत आहेत. लोकसभेत २२ आणि राज्यसभेत ८ खासदार असलेला द्रमुक पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नेते स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी तातडीने चेन्नईला रवाना झाले, असे त्यांनी म्हटले.
ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले, केवळ भाजपला फायदा होईल अशा प्रकारे मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल. त्यांनी भाजपवर महिला आरक्षणाच्या नावाखाली महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. सरकारने लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांच्या मर्यादेतच ३३ टक्के आरक्षण लागू केले पाहिजे. ठाकरेसेनेने एक व्हिप (आदेश) जारी केला असून, बंडखोर खासदारांसह पक्षाच्या सर्व नऊ खासदारांना त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.






