Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या नामुष्कीजनक पीछेहाटीबद्दल रोखठोक भूमिका मांडली. आघाडीत लोकसभा निवडणुकीवेळी आपलेपणा होता. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी मीपणा आला. त्यातून पराभव झाला, अशी स्पष्टोक्ती करत त्यांनी आघाडीला खडे बोल सुनावले.
मागील वर्षी राज्यात काही महिन्यांच्या अंतराने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. उद्धवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. मात्र, काही महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत चित्र उलटे झाले. त्याविषयी उद्धव यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले.
ती मुलाखत घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी दोन्ही निवडणुकांच्या निकालांमधील तफावतीविषयी प्रश्न विचारला. उद्धव यांनी उत्तरादाखल लोकसभा निवडणुकीवेळी मिळालेले यश डोक्यात गेल्याचे मान्य करावे लागेल, असे म्हणत महाविकास आघाडीला खडे बोल सुनावले. विधानसभा निवडणुकीवेळी जागावाटपाची चर्चा अखेरच्या क्षणापर्यंत ताणली गेली. जागावाटपावरून तू-तू,मैं-मैं चालू होते. त्यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. पुन्हा तशीच चूक करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ नाही, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.
ठाकरे केवळ ब्रँड नाही; महाराष्ट्राची ओळख
ठाकरे केवळ ब्रँड नसून महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि हिंदू अस्मितेची ओळख आहे. आमची ओळख अनेकांनी पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसा प्रयत्न करणारेच पुसले गेले, असे म्हणत उद्धव यांनी भाजप आणि शिंदेसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ठाकरे ब्रँड हा काही आम्ही तयार केलेला नाही. तो लोकांनी स्वीकारला आहे. ठाकरे ब्रँडमध्ये नेमके काय आहे ते जनताच सांगू शकेल.
आज माझ्याकडे काहीही नाही. तसे असूनही जातो तिथे लोक आपुलकीने स्वागत करतात. माझ्याशी बोलतात. अनेक पिढ्यांपासून आमची मुळे मराठी मातीत रूजली आहेत. ठाकरे घराण्यासाठी संघर्ष नवा नाही. माझ्या समवेत आदित्य आहेत. आता राजही सोबत आले आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. त्यातून उद्धव आणि राज या ठाकरेबंधूंमध्ये राजकीय युतीही होणार असल्याचा अर्थ काढता येऊ शकणार आहे. उद्धव यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. त्यांनी निवडणूक आयोगावरही टीकास्त्र सोडले.




