मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यावर ठाकरेंचे लक्ष ! गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आता उत्तर भारतीयांशी संवाद

मुंबई- राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दृष्ट्रीकोनातून सर्व पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा विदर्भ दौरा केला आहे. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहेत.
22 जुलैला उद्धव ठाकरे ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा घेतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे आणि विभागानुसार बैठकांना देखील पक्षाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे.
येथील रंगायतन या ठिकाणी उत्तर भारतीयांचा मेळावा होणार असून या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे स्वत: उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता या मेळाव्याला सुरूवात होणार आहे. यात पक्षाची वरीष्ठ नेते मंडळी उपस्थित असतील.
मुंबई-ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे. आतापर्यंत मराठी माणसावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबियांकडून आता उत्तर भारतीयांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.




