नरेंद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांचा कयास
मुंबई : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताच त्यांचे लोकसभा निवडणुकीतील विरोधक माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात तर्क वितर्काना उधाण आले आहे. दरम्यान पाटील यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला तरी हीच लढत पुन्हा होईल असे मानले जात आहे.
उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत भाजपात प्रवेश करण्यापूर्वी उदयनराजेंनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.तो स्विकारल्यामुळे, सातारा लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होईल. या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील आणि शरद पवार यांची भेट लक्षवेधी ठरली आहे.
दरम्यान, येत्या 25 सप्टेंबरला नवी मुंबईत माझे वडील दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी होणार आहे. शरद पवारांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मी पवार यांची भेट घेतली, असा खुलासा पाटील यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
साताऱ्याची जागा युतीत शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या जागेवर उदयनराजे यांना उमेदवारी देणार की शिवसेना आपला उमेदवार उभा करणार याचा निर्णय दोन्ही पक्षश्रेष्ठी घेतील. पण उदयनराजेंसाठी शिवसेनेने या जागेवरील हक्क सोडल्यास त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे या पार्श्वभूमीवर राजकीय निरीक्षकांचे या भेटीकडे लक्ष लागले आहे.