Satara: जिल्हा बँकेसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजेंनी कसली कंबर
Satara या मेळाव्यातून मतदारांची बांधणी आणि निवडणुकीतील राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे. बँकेच्या संचालकपदांच्या नऊ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 12 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात 2,019 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, प्रत्येक मताला महत्त्व आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबरच जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या रणनीतीकडेही लक्ष आहे.

Satara: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा तापू लागला आहे. संचालकपदाच्या दहा वर्षांच्या पात्रतेच्या निकषामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निवडणुकीतून बाहेर असले, तरी बँकेच्या राजकारणातील त्यांची भूमिका अद्याप केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत सातारा तालुक्यातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी (दि. 28) सायंकाळी 6 वाजता शेंद्रे येथे अजिंक्यतारा साखर कारखान्यावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यातून मतदारांची बांधणी आणि निवडणुकीतील राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे. बँकेच्या संचालकपदांच्या नऊ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 12 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात 2,019 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, प्रत्येक मताला महत्त्व आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबरच जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या रणनीतीकडेही लक्ष आहे.
मतदारांशी संवाद आणि राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भूमिका महत्त्वाची आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी सातारा येथे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या संकुलात बैठक झाली. नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे सातारा पालिकेतील गटनेते अविनाश कदम आणि पालिकेच्या विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे आणि त्यांची मेळाव्यात उपस्थिती रहावी यासाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपवण्यात आली. या बैठकीत अमोल मोहिते आणि अविनाश कदम यांनी मार्गदर्शन केले. पात्रतेच्या निकषामुळे काही नेत्यांना या निवडणुकीत स्वत: उतरता आले नसले, तरी त्यांच्या राजकीय प्रभावाची परीक्षा होणार आहे. त्यामुळे शेंद्रे येथील मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.





