तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी यांची वर्णी

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवारी मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा केली होती. त्यांच्या शिफारशीवरुन राज्यपाल एन. रवी यांनी अधिसूचना जारी केली. राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार, रविवारी (दि.२९) नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले.
यासह व्ही. सेंथिल बालाजी यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली. व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांना आता पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. यासोबतच डॉ. गोवी चेझियान, आर. राजेंद्रन आणि एसएम नस्सर यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या शपथविधीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
तत्पूर्वी, उदयनिधी स्टॅलिन यांनी रविवारी चेन्नईतील एम करुणानिधी यांच्या स्मारकाला भेट दिली. याशिवाय पेरियार यांच्या स्मारकाला आणि त्यांच्या आजोबांच्या गोपाळपुरम आणि चेन्नईतील सीआयटी कॉलनी येथील घरांनाही त्यांनी भेट दिली. दरम्यान, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत ‘एआयएडीएमके’ सरकार कोसळले आणि ‘डीएमके’ सरकार सत्तेवर आले. त्यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. नंतर २०२२ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदलात उदयनिधी स्टॅलिन यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री करण्यात आले. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी नुकतीच सहकारी मंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री हे पद नसून एक जबाबदारी आहे. फादर पेरियार (पेरींगर अण्णा) आणि मुथामिझारिंगर कलैगनर यांच्या उन्नतीच्या मार्गावर आम्ही काम करत राहू. तामिळनाडूच्या जनतेसाठी मी माझ्या सहकारी मंत्र्यांसोबत काम करेन.
– उदयनिधी स्टॅलिन, उपमुख्यमंत्री





