उदय सामंत हल्ला प्रकरण: “विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये”; डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या प्रकरणी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना,” पुण्यात आज शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेच्या नंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. बऱ्याच वाहिन्यावर चित्रीकरण गेलेला आहे. या सगळ्या घटनेच्या मध्ये पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे लोक आहेत ते कोण आहेत नक्की ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गृहीत धरणे की हे शिवसैनिकच आहेत किंवा कसं आणि तो हल्ला काही पूर्वनियोजित आहे की काय वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले जातात ते योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आमच्या सभेच्या मध्ये आदित्य साहेबांनी जे भाषण केलं, आमची जी भाषणे झाली ते संपूर्णपणे लोकशाही चौकटीतलेच विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनाची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.





