मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी युद्ध अजून संपलेले नाही… अशा मथळ्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यावरून तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे, असा टोला उदय सामंत यांनी अमित ठाकरेंना लगावला. तर मोदींना लिहिलेले पत्र म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला बालिशपणा असल्याची टीका भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे. तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली काढली जात आहे, असे उदय सामंत म्हणाले. हा अमित ठाकरेंचा बालिशपणा-महाजन अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले पत्र प्रसिद्धीसाठीचे पत्र असून हा बालिशपणा आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला. संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आपण काय केले म्हणून? तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. संपूर्ण जगाने पाहिले, आमच्या सैन्याने काय केले आणि तुम्हाला आता काय त्याचा रिझल्ट पाहिजे, हा संपूर्ण बालिशपणा चालला आहे. प्रसिद्धीसाठी असे पत्र लोक का लिहितात? मला काही कळत नाही, असे पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाहीये, असे गिरीश महाजन म्हणाले.