Uday Kotak: उदय कोटक यांना ‘पद्मभूषण’; बँकिंग क्षेत्रातील योगदानाचा गौरव
Uday Kotak: व्यापार, उद्योग, कला, समाजसेवा आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये उदय कोटक यांचा झालेला गौरव भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Uday Kotak: देशातील वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उदय कोटक यांना वर्ष २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी आयोजित समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही सर्वोच्च पातळीवरील दखल मानली जात आहे.
उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेची उभारणी करत भारतीय खासगी बँकिंग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. वित्तीय सेवा, उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेला नवी दिशा मिळाल्याचे मानले जाते.
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग क्षेत्रातील अन्य मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, दास ऑफशोर इंजिनिअरिंगचे अशोक खाडे तसेच टीटीके समूहाचे अध्यक्ष टीटी जगन्नाथन (मरणोत्तर) यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
१३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी –
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये यंदा राष्ट्रपतींकडून एकूण १३१ पुरस्कारांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ६६ मान्यवरांना शनिवारी सन्मानित करण्यात आले. ५ जणांना ‘पद्मविभूषण’, १३ जणांना ‘पद्मभूषण’, तर ११३ जणांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाच्या यादीत १९ महिलांचा समावेश असून, सहा विदेशी, एनआरआय किंवा ओसीआय कार्डधारकांनाही पद्म सन्मान जाहीर झाला आहे. तसेच १६ मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.
दरम्यान, पद्मविभूषण पुरस्कारासाठी सर्वप्रथम दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी स्वीकारला.
व्यापार, उद्योग, कला, समाजसेवा आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये उदय कोटक यांचा झालेला गौरव भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.





