Shivsena UBT : संजय शिरसाठांच्या एकत्रित येण्याच्या विधानावर उबाठाचे थेट प्रतिउत्तर; उद्योग मंत्र्यांनाही काढला चिमटा

पुणेः शिवेसनेचे दोन गट पडले याचं दुखः आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले पाहिजे, असे एकत्र येण्याबाबतचे विधान शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. त्यांच्या या विधानाला शिवसेना उबाठा गटाने खोडून काढत थेट प्रतिउत्तर दिले आहे.
शिवसेना उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांनी आम्ही गद्दारांशी कधीही जवळीक करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून ज्यांनी शिवसेना पक्ष फोडला, त्यांच्याशी जवळीक करणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांना रत्नागिरी येथे दिली.
उद्योग मंत्र्यांना फोडाफोडीशिवास दुसरे उद्योग नाही
राज्यात शिंदे गटाच्या अॅापरेशन टायगर याची जोरदार चर्चा केली जात आहे. या अॅापरेशनची मदार शिंदे सेनेच्या उदय सामंत यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. सामंत हे दावौस दोऱ्यावर असताना उबाठा गटातील तसेच काँग्रेस पक्षातील अनेक नेते संपर्कात असल्याचे विधान केले होते. यानंतर राज्यात शिंदे गटाच्या टायगर अॅापरेशनची चर्चा आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, उद्योग मंत्र्यांना आता पक्ष फोडाफोडीशिवाय दुसरे कोणतेही उद्योग नाही. केवळ स्वत:चा पक्ष फोडणं या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही उद्योग त्यांना राहिलेले नाही, असा निशाणा त्यांनी उदय सामंत यांच्यावर साधला.
संजय शिरसाठ नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेचे दोन गट पडले याचं दुख: आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले पाहिजे. शिवसेना एकत्र यायला हवी, असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटते आहे. आजही आम्ही सुखदु:खाची विचारपूस करतो. अशावेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, दोन्ही नेत्यांनी आता एकत्र येण्याची वेळी आली आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाठ यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीला दिली.
शिवसेनेचे अॅापरेशन टायगर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील विविध ठिकाणची चाचपणी केली जात आहे. शिवसेनेकडून काही धोरणांची पुनर्बांधणी देखील करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलच ढवळून निघालेले आहे. यातच शिवसेना शिंदे गटाकडून अॅापरेशन टायगर राबविले जात असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेत लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे शिवसेनेच्या संपर्कात अजूनही काही नेते असल्याचे बोलले जात आहे.





