U19 World Cup 2024 Super Six stage (India vs New Zealand) :- अंडर-19 विश्वचषकात आज भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना सुरु आहे. सुपर सिक्सचा हा सामना ब्लोमफॉन्टेन येथील मंगाँग ओव्हल येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने आपले सर्व गटस्तरीय सामने जिंकले होते. त्याचबरोबर न्यूझीलंडने गटस्तरावर तीनपैकी दोन जिंकले होते. त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला आपली विजयी मालिका कायम ठेवायची आहे.
सुपर सिक्समध्ये भारताने न्यूझीलंडसमोर 296 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने 126 चेंडूत 131 धावांची खेळी केली. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
Innings Break!
A splendid 1⃣3⃣1⃣ from Musheer Khan propels #TeamIndia to 295/8 👌👌
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/UdOH802Y4s#BoysInBlue | #INDvNZ pic.twitter.com/eC5SOg7CEh
— BCCI (@BCCI) January 30, 2024
भारतीय डाव…
टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आदर्शने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 77 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. आदर्श 58 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत 87धावांची भागीदारी केली.
मोठ्या फटकेबाजीच्या प्रयत्नात उदयने आपली विकेट गमावली. तो 34 धावा करून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. अरावेली अवनीश 17 धावा करून बाद झाला, प्रियांशू मोलिया 10 धावा करून बाद झाला, सचिन दास 15 धावा करून बाद झाला.
दरम्यान, मुशीर खानने शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने चार सामन्यांच्या चार डावात 81.25 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध तीन धावा, आयर्लंडविरुद्ध 118 धावा आणि अमेरिकेविरुद्ध 73 धावा केल्या होत्या. या सामन्यात तो 126 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 131 धावा करून बाद झाला.
मुरुगन अभिषेक चार धावा करून बाद झाला. तर नमन तिवारी तीन धावा करून नाबाद राहिला आणि राज लिंबानी दोन धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत मेसन क्लार्कने चार विकेट घेतल्या. तर रेयार सोर्गस, इवाल्ड श्रुडर, जॅक कमिंग आणि ऑलिव्हर टेवाटिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.