#U19CWC | पाकिस्तानला नमवित ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

अँटिग्वा – वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 119 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार कासिम अक्रमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कॅम्पबेल केलवे आणि टिग विली या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलीच समाचार घेतला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 16.4 षटकांत 86 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॅम्पबेल 47 धावा करून बाद झाला. पण विलीने संयमी खेळी करत विश्वचषकातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 38व्या षटकात 71 धावावर तो माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोरी मिलरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 बाद 276 धावा केल्या.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक ठरली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 5 षटकात पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर मोहम्मद शहजाद आणि हसिबुल्ला खान यांना माघारी धाडले. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने त्यांची 7 बाद 100 अशी अवस्था झाली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेर पाकिस्तानचा डाव 35.1 षटकात 157 धावांवर संपुष्टात आला.
पाकिस्तानच्या 5 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. मेहरान मुमताजने सर्वाधिक 29 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून विल्यम सेल्झमनने 3, तर टॉम व्हिटनी आणि जॅक सेनफेल्डने प्रत्येकी दोन गडी बाद केले.





