अमेरिकेच्या संसदीय अहवालात चिंताजनक माहिती उघड; पाकिस्तानात 12 विदेशी दहशतवादी संघटना सक्रिय

वॉशिंग्टन – पाकिस्तानमध्ये 12 विदेशी दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केलेल्या संघटना सक्रिय आहेत. या 12 संघटनांमध्ये भारत केंद्रीत लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहंम्मद या संघटनांचाही समावेश आहे. दहशतवादासंदर्भात अमेरिकेच्या संसदेच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांची यादीच अमेरिकेने तयार केली आहे. यातील काही संघटना 1980 पासून अस्तित्वात आहेत, असे कॉंग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या “टेररिस्ट ऍन्ड मिलिटंटस ऑर्गनायजेशन ग्रुप इन पाकिस्तान’ या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्वॉड गटाच्या बैठकीच्या दिवशीच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या दहशतवादी गटांचा प्रामुख्याने जागतिक, अफगाणिस्तान, भारत, जम्मू काश्मीर, देशांतर्गत आणि शियाविरोधी अशा 5 गटांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे.
लष्कर ए तोयबाची स्थापना 1980 मध्ये केली गेली आणि 2001 मध्ये ही संघटना विदेशी दहशतवादी संघटना घोषित केली गेली. मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी ही संघटना जबाबदार आहे. तर काश्मीरमधील दहशतवादी अझहर मसूदने जैश ए मोहंम्मदची स्थापना 2000 साली केली, 2001 साली या संघटनेने संसदेवर हल्ला केला होता. त्याच वर्षी या संघटनाला विदेशी दहशतवादी संघटना घोषित केले गेले होते.
रशियाविरोधी दहशतवाद्यांनाही पाकिस्तानात स्थान
पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या विदेशी दहशतवादी संघटनांमधील हरकत उल जिहाद इस्लामी (हुजी) रशियाविरोधात अफगाणिस्तानात लढण्यासाठी स्थापन झाली होती. हिज्ब उल मुजाहिदीन पाकिस्तानातील सर्वात मोठी राजकीय पक्षाशी संबंधित संघटना आहे.
याशिवाय अल कायदा, अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट, इस्लामिक स्टेट खोरासान प्रोव्हिन्स, अफगाण तालिबान, हक्कानी नेटवर्क, तेहरिक ए तालिबान पाकिस्तान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, जुंदल्ला उर्फ जैश अल अदि, सिपाह ए साहबा पाकिस्तान आणि लष्कर ए झांघवी या संघटना पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.





