हॉंगकॉंग : तपाह हे चक्रिवादळ चीनच्या दक्षिणेकडील भागाकडे सरकत असल्यामुळे या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी या भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. वादळाचा संभाव्य धोका असलेल्या भागातून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हॉंगकॉंगजवळच्या ग्वांगडोंग या आर्थिक व्यवहारांचे केंद्र असलेल्या प्रांतातल्या काही रेल्वे आणि प्रवासी बोटींची सेवा थांबवण्यात आली आहे. तब्बल ६० हजार नागरिकांना रविवार दुपारपासून दुसरीकडे हलवण्यात आले आहे, असे चीनमधील सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:५० वाजता ग्वांगडोंगमधील तैशान शहराच्या किनारपट्टी भागात वादळ धडकले. वादळाच्या केंद्राजवळ वारे प्रति सेकंद ३० मीटर वेगाने वाहत आहेत. रविवारी रात्री हाँगकाँगच्या वेधशाळेने ८ व्या क्रमांकाच्या वादळाचा इशारा दिला. हा इशारा हवामान प्रणालीतील तिसरा सर्वोच्च इशारा आहे. हॉंगकॉंगमधील सुमारे १०० उड्डाणे रद्द करण्यात आली, काही प्रवासी विमानतळावर प्रवास माहितीची वाट पाहत झोपले होते. एक विमान उतरत असताना इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसले होते. त्यानंतर धावपट्टी बंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. विमानातून धूर का येऊ लागला हे समजू शकले नाही. दक्षिण चीनमध्ये झाडे पडल्याच्या १०० घटना घडल्या. यामध्ये ३ जण जखमी झाले. मकाऊ येथील काही ठिकाणी पूर आला आहे.