Typhoon Mawar : फिलिपाईन्समध्ये मवार वादळाचा धोका, हजारो नागरिकांना…

मनिला – फिलिपाईन्समध्ये मवार या वादळाचा धोका वर्तवण्यात आल्यामुळे तेथील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येऊ लागले आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून समुद्रात कोणत्याही बोटींना जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. “मवार’ हे चक्रिवादळ आठवड्याभरापासून अमेरिकेच्या गुआम भागामध्ये घोंघावत होते. आता ते फिलिपाईन्सच्या उत्तरेकडील भागाकडे सरकत आहे.
वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 155 किमी पासून 190 किमी इतका आहे. हे वादळ उत्तरेकडील डोंगराळ भागातून पुढे सरकत आहे. सध्याच्या अंदाजानुसार हे वादळ ईशान्येकडील भागातून या आठवड्याच्या मध्यात तैवान आणि जपानच्या दक्षिणेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
वादळामुळे मंगळवारपासून बुधवारपर्यंत समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असून पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याचीही भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत 5 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून आणखीन लोकांना स्थलांतर करावे लागू शकते.





