Baramati Crime News: शेरेवाडीत दोन महिलांचा निर्घृण खून; परिसरात खळबळ
Baramati Crime News: घरासमोर झोपलेल्या महिलांवर मध्यरात्री शस्त्राने हल्ला; चोरीच्या उद्देशाचा प्राथमिक संशय

मोरगाव : बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे घरासमोर झोपलेल्या दोन महिलांवर मध्यरात्री शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेरेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
इंदुमती मारुती लडकत (वय ६५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५०) अशी मृत महिलांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपासातून त्याचा उलगडा होणार आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही महिला घरासमोरील जागेत झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घराचे दार तोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर बाहेर झोपलेल्या महिलांवर शस्त्राने हल्ला करण्यात आला. इंदुमती लडकत यांच्या मानेवर शस्त्राने वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत झोपलेल्या कृष्णाबाई लडकत यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच परिसरातील माहिती, उपलब्ध पुरावे आणि इतर संभाव्य बाबींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेचा अधिकृत तपशील तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.





