Pune Crime: म्हातारा संगतीला आणि कटर कमरेला…; दोघा मैत्रिणींनी तयार केली ‘बांगडी कटर’ टोळी; 7 गुन्हे उघडकीस

पुणे – पीएमपी बसमध्ये गर्दीच्या वेळी ज्येष्ठ महिलांच्या हातातील बांगड्या कटरने कापून चोरण्याच्या घटना वाढल्या होत्या. एक-दोन टोळ्या हाती लागल्या तरी चोऱ्या कमी होत नसल्याने गुन्हे शाखेने कसून शोधकार्य सुरू केले. दरम्यान, दोन मैत्रिणींनी तयार केलेली टोळी हाती लागली. या दोघींनी एका वयोवृद्ध नागरिकाच्या मदतीने वर्षभरात शहरात धुमाकूळ घातला होता, त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले. ७ लाख ६७ हजाराचे १३ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
सुरेखा ऊर्फ नग्गी छोटु जाधव (वय ३४) आणि शितल ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३३, दोघी रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक महिलांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले की, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे आणि उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानूसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही बस थांब्यावर वॉच ठेवला.
पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना खबर मिळाली की, बांगडी कटर दोन महिला पालिकेजवळील बसथांब्यावर थांबलेल्या आहेत. त्यानूसार एका पथकाने तेथे धाव घेतली. या महिला गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोबाइल व एक कटर हस्तगत करण्यात आला.
या महिलांनी सहा गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर एक गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला आहे. सहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अय्याज दड्डीकर, अजय थोरात, अभिनव लडकत, दत्ता सोनवणे, निलेश साबळे, महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांनी तपास केला.
…असा करायच्या हात साफ
महापालिकेच्या जवळील बसथांबे नेहमी गजबजलेले असतात तेथे सायंकाळी ज्येष्ठ प्रवासी महिलांना दोघी हेरायच्या. त्यांचा वयोवृध्द साथीदार आणि एका तरुणीसोबत घोळक्याने थांबायच्या. बस येताच आधी वयोवृध्द साथीदाराला बसमध्ये चढायला लावायच्या त्याला पायऱ्यांवरुन चढण्यास खूप वेळा लागायचा. तोपर्यंत रांगेत थांबलेल्या एखाद्या ज्येष्ठ महिलेजवळ कोंडाळे करुन तीच्या हातावर तरुण साथीदार ओढणी टाकायची. त्यानंतर हलक्या हाताने दोघींपैकी एक जण कटरने महिलेची बांगडी कापून मागच्या मागे पळ काढायच्या. तर, वयोवृद्ध साथीदार पुढच्या दाराने उतरायचा. मागील तीन ते चार वर्षापासून या महिला अशी चोरी करीत आहेत.





