पुणे जिल्हा | इंदापूरच्या 22 गावांना दोन टीएमसी पाणी

वालचंदनगर, (वार्ताहर) – सणसर कटमधून चालू वर्षी खडकवासलाचे 2 टीएमसी पाणी हे इंदापूर तालुक्यातील 22 गावांना देण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.12) दिली.
निरवांगी नजीक दगडवाडी (ता. इंदापूर) येथील प्राचीनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी पूजा केली व दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी गेले अनेक वर्षांपुर्वी सणसर कटची सुमारे 38 कोटी रुपयांचा निधीचा वापर करून निर्मिती झाली.
मात्र आजअखेर खडकवासल्याच्या पाण्याचा अद्याप एक थेंबही शेतकर्यांना मिळालेला नाही. सणसर कटचा कालवा बंद असल्याने त्याची मोठी दुरवस्था झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, मी सत्तेवर असताना सतत पाठपुरावा करून व राजकीय ताकद वापरून 22 गावांसाठी 7 नंबर फॉर्मवर पाणी मिळवून दिले आहे.
सध्या नीरा डावा कालव्याला 59 फाट्याला आवर्तन सुरू असून, आवर्तन संपल्यानंतर 54 व 57 या फाट्यांना आवर्तन दिले जाईल. चालू पिके जगण्यासाठी पाहिजे तेवढे पाणी सर्व शेतकर्यांना या आवर्तनात दिले जाणार आहे.
श्री नंदिकेश्वर मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी काळात चांगला दमदार पाऊस होऊन, शेतकरी, जनता सुखी समाधानी राहू दे, असे साकडे नंदिकेश्वर चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र सुळ यांनी केले.
यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष यांना लालासाहेब पवार, निरा भीमा कारखान्याचे संचालक दत्तात्रय पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उपसरपंच वैभव जाधव यांनी मानले.
भीमा व निरा खोर्यातील सर्व धरणे पाण्याने भरली आहेत. या धरणातील शेतीसाठीच्या पाण्याचे वर्षभराचे नियोजन चांगले केले जाईल, त्यामुळे शेतकर्यांनी उसाची लागवड करावी, कारण उस पीक आता शेतकर्यांना परवडत आहे. केंद्र सरकार उसाची एमएसपी वाढवणार आहे. – हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर संघ
एकही लाडकी बहीण वंचित राहू नये
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्या भगिनींचा आत्मसन्मान निर्माण करणारी आहे. इंदापूर तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, अशी सूचना नूतन तहसीलदार जीवन बनसोडे व अधिकार्यांना दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.




