PCMC News: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दोन अधिकारी निलंबित
PCMC News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
पुनावळे येथील एका इमारतीच्या अग्निशामक प्रशमन शुल्कातील अनियमिततेप्रकरणी कार्यकारी अभियंता विजय सोनवणे आणि उपअभियंता अशोक मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषार हिंगे यांनी सहशहर अभियंता सुनील भागवाणी आणि कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. बांधकाम परवानगीसाठी दाखल फायलींमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक त्रुटी काढून मंजुरी रखडविली जाते.
तसेच, संबंधितांकडून प्रतिचौरस फूट पाच ते सहा रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले.
दरम्यान, पुनावळे येथील इमारतीच्या प्रशमन शुल्कासंदर्भातील ‘प्रपत्र अ’ आणि ‘प्रपत्र ब’मध्ये तफावत आढळली. त्याबाबत समाधानकारक खुलासा न केल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोनवणे आणि मोरे यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार निलंबित केले. त्यांची विभागीय चौकशीही केली जाणार असून, निलंबन काळात मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
Pimpri-Chinchwad : ‘पेपर लगदा’ बाप्पाला पसंती! हलक्या, सुबक मूर्तींसोबत धोतर-फेटा लूकचीही क्रेझ





