Pimpri-Chinchwad : ‘पेपर लगदा’ बाप्पाला पसंती! हलक्या, सुबक मूर्तींसोबत धोतर-फेटा लूकचीही क्रेझ
Pimpri-Chinchwad : कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली

पिंपरी – बाप्पाची मूर्ती घ्यायची, पण पर्यावरणाचीही काळजी घ्यायची. या विचारातून पिंपरी-चिंचवडकरांची पावले आता पर्यावरणपूरक गणेशमूर्तींकडे वळली आहेत. यंदा पेपर लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींना चांगली पसंती मिळत आहे.
वजनाने हलक्या आणि दिसायला आकर्षक असलेल्या या मूर्ती घरगुती गणेशोत्सवासाठी विशेष मागणीच्या ठरत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत पीओपीच्या मूर्तींपेक्षा पर्यावरणपूरक पर्यायांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवाला आता दोन दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे शहरातील गणेशमूर्तींच्या बाजारपेठा सजल्या आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि निगडी परिसरात मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. सकाळपासूनच स्टॉलवर ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. पेपर लगद्याच्या मूर्ती हा यंदाच्या बाजारपेठेतील महत्त्वाचा ट्रेंड ठरला आहे. कागदाच्या लगद्याचा वापर करून या मूर्ती तयार केल्या जातात. त्यात मातीचाही वापर केला जातो. त्यामुळे मूर्तीला आकर्षक रूप मिळते. वजनही कमी राहते.
लहान घरगुती गणपतीसाठी या मूर्ती उपयुक्त ठरत आहेत. दीड फुटापर्यंतच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. मूर्ती उचलणे सोपे जाते. वाहनातून नेणेही सहज शक्य होते. विसर्जनासाठी नेतानाही त्रास कमी होतो. यंदा मूर्तींच्या रूपातही विविधता पाहायला मिळत आहे.
पारंपरिक रूपासोबत आधुनिक पोशाखातील बाप्पा बाजारात आले आहेत. धोतर-फेटा परिधान केलेल्या गणेशमूर्ती तरुणांचे लक्ष वेधून घेत आहेत. सुबक दागिने, आकर्षक मुकुट आणि नाजूक कलाकुसर असलेल्या मूर्तींनाही मागणी आहे.
कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. तरीही काही मूर्तिकारांनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. थेट उत्पादकांकडून कच्चा माल आणला जात असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी मागील वर्षाच्या आसपासच्या दरातच मूर्ती उपलब्ध आहेत.
पीओपीच्या मूर्तींची मागणी कमी होत असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. पर्यावरणपूरक मूर्तींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यामुळे पेपर लगदा, माती आणि इतर नैसर्गिक साहित्याच्या मूर्तींकडे ग्राहक वळत आहेत. विशेष दागिने आणि अतिरिक्त कलाकुसरीसाठी साधारण एक हजार ते दोन हजारांपेक्षा अधिक खर्च येऊ शकतो.
शाडू मातीच्या बाप्पाचे आकर्षण कायम
पेपर लगद्याच्या मूर्तींना वाढती पसंती मिळत असली, तरी शाडू मातीच्या गणेशमूर्तींची मागणी कायम आहे. शाडू मातीच्या मूर्तींना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नैसर्गिक माती, सुबक घडण आणि पारंपरिक रूप यामुळे या मूर्तींना विशेष महत्त्व आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार करणाऱ्या भाविकांसाठी शाडू मातीचा बाप्पा आजही विश्वासाचा पर्याय ठरत आहे.
मूर्तीचा आकार अंदाजे दर
८ इंच ₹१,२००
१० इंच ₹१,५००
१ फूट ₹२,५००
१.२५ ते १.५ फूट ₹३,००० ते ₹३,५००
२१ इंच ₹५,०००
२ फूट ₹६,०००





