पुणे शहरात दोन जणांचा खून; खडक, समर्थ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

पुणे : किरकोळ कारणावरून काका-पुतण्याने एका तरुणास मारहाण करत भिंतीवर डोके आपटले. या मारहाणीत रक्तस्राव, तसेच रक्ताच्या उलट्या झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री कासेवाडी येथे घडली. गोपाल आचार्य असे खून झालेल्या तरुणाने नाव आहे.
याप्रकरणी अमीर शेख आणि दानिश अली शेख (रा. कासेवाडी) यांच्याविरुद्ध खडक पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमिर शेख याने गोपाल यास दारू आणण्यासाठी सांगितले होते.
त्याने दारू आणून दिल्याने अमिर शेखचा पुतण्या दानिश शेख याने गोपाल यास तु माझ्या काकाला दारू का आणून दिली असे म्हणत घराबाहेर नेऊन गल्लीतील एका घराच्या भिंतीवर डोके आपटून हाताने तोंडावर मारहाण केली. त्याचवेळी तेथे आलेल्या आमिर शेखनेही त्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यामुळे गोपाल यास डोकेदुखीचा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यास ससून रुग्णालयात दाखल केले असता डोक्यात रक्तस्राव होऊन, तसेच रक्ताच्या उलट्या झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फिरस्त्याचा खून
मालधक्का चौकात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. त्याचे शवविच्छेदन केले असता, त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तो फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





